हिवाळ्यातही येथील दर्याखोर्यातून मुक्तपणे भटकत सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेण्यातील आनंद निव्वळ अवर्णनीय. महादेवगड, मनोहरगड, श्रीरगावंकर पॉईंट या कड्यांवरून विस्तीर्ण पसरलेल्या दर्याखोर्या पाहताना विलोभनीय आनंद मिळतो. सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य तर अक्षरशः वेड़ लावते. क्षितिजास नारंगी, लाल व गुलाबी रंगछटांची आभा देत सूर्य अस्ताला जातो.निसर्गप्रेमीशिवाय साहसी व अभ्यासू पर्यटकांनाही अंबोली निराश करत नाही. ह्या भागास धार्मिक महात्म्यही लाभले आहे. हिरण्यकेशी ह्या भगवान शंकराच्या पवित्र स्थानी महाशिवरात्रीस हजारो भाविक भेट देतात. येथून हिरण्यकेशी नदी उगम पावून संपूर्ण परिसरास हिरवाईचे लेणे देते. येथील नदीच्या खोर्यात भटकत तासनतांस मासेमारीचा आनंदही अनुभवता येतो. शिवलिंगास लागून साहसी पर्यटकांना आव्हान देणारी तीनशे मीटर रूंदीची गुहाही येथे आहे.
अंगावर शहारे आणणारा काळोख, चावणारे डास, रक्त शोषणाऱ्या जळवा व जीव गुदमरवणारी कोदंट हवा यासारखी आव्हाने झेलून मार्ग काढावा लागतो. गुफेत सात डबकी आहेत. शेवटच्या डबक्यात सूर्याचे दर्शन घडते. हेही एक आश्चर्यच. मात्र, त्या उजेडाच्या रहस्यावर अद्यापपर्यंत रहस्याचे आवरण आहे. अंबोलीत ऐतिहासिक व समृद्ध बॉटॅनिकल गार्डनही आहे. मित्र किंवा कुटुंबीयांसोबत मुक्तपणे येथील जंगलात भटकत जैवविवधतेच्या निरीक्षणाचा अनुभवही अतुलनीय आहे. भटकंतीमुळे थकल्यावर वनभोजन घेऊन ही भेट अविस्मरणीय करता येते. येथे राहण्याचीही सोय आहे. विविध हॉटेल्स आहेत. शिवाय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रहायची सोयही आहे.
जाण्याचा मार्ग : मुंबईपासून अंबोली घाटाचे अंतर सुमारे साडेपाचशे किलोमीटर आहे. मुंबईहून येथे बस व रेल्वेनेही पोहचता येते. सावंतवाडीहून अंबोली अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे. कोकण रेल्वेने आपणांस सावंतवाडीस पोहचता येते. कोल्हापूरहून हे ठिकाण चार तासांच्या अंतरावर आहे.
लोड होत आहे...