शाळेत 'कल्पनाविस्तार' नावाचा लेखनप्रकार असतो. त्यात 'मला लॉटरी लागली तर', 'सूर्य नसता तर', या व अशा विषयांवर गमतीदार निबंध तयार होतात. त्याच चालीवर 'भिका-याला एका कंपनीत मोठ्या पदावर नोकरी दिल्यास', असा विषय दिग्दर्शकाला दिल्यास तो काय करेल, याची झलक 'अदला बदली'त पाहायला मिळते.
हुशारी ही माणसाच्या रक्तात असते की परिस्थितीवर अवलंबून असते यावर बांधकाम व्यावसायिक बंधू राम व शाम यांची पैज लागते. त्यासाठी ते त्यांच्या ऑफिसमधील प्रामाणिक व मेहनती वैभवला नोकरीवरून काढतात आणि त्याच्या जागी ऑफिसबाहेर बसणाऱ्या चंदू भिकाऱ्याला बसवतात. मग सुरू होतात अनेक गमती जमती. मात्र, राम व शामच्या पैजेखातर आपण इथे आहोत आणि वैभव बेघर झालाय हे कळतच चंदू व वैभव वेगळाच प्लान करतात आणि राम-शामची दोघांची चांगलीच 'आथिर्क' खोड मोडतात.
सचिन पिळगांवकर व अशोक सराफ ही मराठीतील सुपरहिट जोडी, मंगेश सावंत यांचं छायाचित्रण, सचिन व आदिती भागवत यांच्यावर चित्रित केलेलं 'राजसा सांग ना' हे गाणं, अशोक सराफ यांचं विनोदांचं टायमिंग आाणि विजू खोटे व आनंद अभ्यंकर यांचा अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे.
सात-आठ वर्षांपूवीर् व त्याअगोदर एक दशकभर मराठीत विनोदी चित्रपटांची मोठी लाट आली होती. त्यातील अनेक चित्रपट केवळ विनोदी आहेत (निर्मात्यांचा दावा!) म्हणून त्यातील अनेक प्रसंगांना प्रेक्षक उगाचच हसून दाद द्यायचे. तसं काहीसं या चित्रपटाचं झालं आहे. म्हणूनच अंगावर जरासा फाटका सदरा किंवा जॅकेट दाखवलेला असला तरी मुळातच गुळगुळीत दाढी केलेला चंदू कोणत्याच अँगलने भिकारी वाटत नाही.
सचिन पिळगांवकर व अशोक सराफ यांच्यामुळं प्रेक्षक चित्रपटाकडं वळतो, हे मान्य केले तरी त्यांना अजूनही तरुण दाखवण्याचा अट्टाहास का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. एक कोटी रुपये घेऊन जाणाऱ्या वैभवला चंदू धडकतो आणि पैसे चोरण्याच्या उद्देशानं तो धडकल्याच्या वैभवच्या आरोपामुळं चंदूला पोलिसांच्या हवाली केलं जातं. हा प्रसंग खूपच नाटकी व खोटा वाटतो. सदीर् झालेल्या वैभवचं लहान मुलांप्रमाणं बोबडं बोलणं म्हणजे विनोदाची हाइट झाली. एका भिकाऱ्याकडून कोणत्या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवावे याचा सल्ला घेणारे बांधकाम व्यावसायिक, सोन्याचा डोंगर १२०० कोटींना विकत घेताना कुठलीही खात्री न करणारे राम व शाम आणि ते १२०० कोटी शेतकऱ्यांच्या नावावर इंटरनेटच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्याचा प्रसंग म्हणजे प्रेक्षक निर्बुद्ध असल्याचा दिग्दर्शकानं करून घेतलेला समज हाच यातील मोठा विनोद आहे.
तेजा देवकर या नवोदित अभिनेत्रीला यात प्रभाव पाडता आलेला नाही. मुळात तिची बोली स्पष्ट होत नाही. कधी ती टपोरी बोलते, कधी भाषेला हेल देते तर कधी शुद्ध मराठी. शिवाय ती सिनेमांची तिकिटे ब्लॅक करणं व तत्सम कामं करून गरीब वस्तीत राहते हे तिच्याकडं पाहून वाटत नाही. आदिती भागवत छोट्याशा रोलमध्येही अगदी फिट्ट बसली आहे. सचिन पिळगांवकर व अशोक सराफ यांच्यासमोरही ती आत्मविश्वासाने उभी राहिली आहे.
हातात वेळ व पैसे आहेत आणि निव्वळ टाइमपास करायचा आहे तर 'अदला बदली' पाहायला हरकत नाही.
.....................
निमिर्ती : एच. आर. फिल्म्स, ज्यु. मेहमूद दिग्दर्शक : ज्यु. मेहमूद
संवाद, पटकथा : हेमंत एदलाबादकर
कलाकार : सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, आदिती भागवत, तेजा देवकर, आनंद अभ्यंकर, विजू खोटे.
दर्जा : **
लोड होत आहे...