एक लहान मुलगा आणि त्याचा बैल या दोघांच्या भावनिक नात्याभोवती गुंफलेला 'टिंग्या' लहानथोरांना भावला. सिनेमाच्या अखेरीस 'टिंग्या'ला खाटकाच्या हवाली केलं जातं. अर्थात त्याला मारलं जातं. पण अॅनिमेशनपटात रूपांतर करताना, तो वाचताना दाखवण्यात येणार आहे. निर्माते रवी राय यांनी ही माहिती उघड केली. ते म्हणाले, की कान्स शहरात होणाऱ्या मिपकॉम फेस्टिवलसाठी मी १० ऑक्टोबरला रवाना होतोय. कान्स ही सिनेमाची मोठी बाजारपेठ आहे. इथे होणाऱ्या निर्मात्यांच्या मेळाव्यात सिनेमाचं अॅनिमेशन, डबिंग, सॅटेलाइट हक्क विकण्याबाबत मी वाटाघाटी करणार आहे. वॉल्ट डिस्ने फिल्मला 'टिंग्या'चे अॅनिमेशन हक्क विकण्याबाबतही या वेळी चर्चा होईल. पण अॅनिमेशनपटात रूपांतर करताना सिनेमाचा सुखांत करण्याचा माझा विचार आहे. त्याचसाठी अॅनिमेशनपटातला 'टिंग्या' वाचणं गरजेचं आहे.
ऑस्करसाठी फिफ्टी-फिफ्टी
' टिंग्या'च्या प्रमोशनसाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचं दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांनी सांगितलं. ते म्हणाले, की आम्ही ऑस्कर प्रमोशनसाठी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. केंदीय कृषीमंत्री शरद पवार यांची पुण्यातील साखर भवन इथे भेट घेऊन आम्ही त्यांना 'टिंग्या'ची डीव्हीडी दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेही 'टिंग्या'ची डीव्हीडी पाठवली आहे. उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांचा हा आवडता सिनेमा असून त्यांनी याबाबत सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. 'टिंग्या'च्या प्रमोशनसाठी दीड कोटी रुपयांचा खर्च असून निर्माते रवी राय यांनी पन्नास टक्के भार उचलण्याची तयारी दाखवली आहे. उरलेली रक्कम राज्य सरकारने खर्च करावी, अशी राय यांची अपेक्षा असून त्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. 'टिंग्या'च्या प्रमोशनसाठी लोकांकडून पैसा मागणार नाही, असं हाडवळे यांनी ठामपणे सांगितलं.
लोड होत आहे...